दहशतवाद्याला पकडून देणा-या दोघा ग्रामस्थांना पुरस्कार – राजनाथ सिंह

0
9

नवी दिल्ली, दि. ६ – जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे दहशतवादी हल्ला करणा-या मोहम्मद नावेदला पकडून देणा-या दोघा ग्रामस्थांना पुरस्कार देण्याची शिफारस जम्मू काश्मीर सरकारला करु अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केली. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना वीरता पुरस्कार दिला जाईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.
जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभा व लोकसभेत निवेदन दिले. बीएसएफच्या तुकडीवर हल्ला करणा-या तिघांपैकी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले तर एकाला जीवंत पकडण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पकडल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद नावेद उर्फ उस्मान असे असून तो पाकचा रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडून दोन एके ४७, ग्रेनेड व अन्य शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले. मोहम्मद नावेदची जम्मू काश्मीरमध्ये चौकशी सुरु आहे असे त्यांनी नमूद केले. शूरवीर जवान व धाडसी ग्रामस्थांची आम्ही प्रशंसा करतो असे सांगत सिंह यांनी संबंधीतांचे कौतुक केले.