आरक्षणाचा पुनर्विचार करा – मोहन भागवत

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२१:- गुजरातमध्ये पटेल समुदायाला आरक्षण देण्याचा मुद्दा गाजत असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील आरक्षण धोरणाचा आढावा घेण्याची गरज असून, त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट केले आहे. भागवत म्हणाले, ‘‘आरक्षणाच्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी समिती तयार करून किती नागरिकांना आणि किती काळासाठी आरक्षण दिले पाहिजे याचा आढावा घेतला पाहिजे. या समितीत राजकीय नेत्यांऐवजी सामाजिक सेवा करत असलेल्या व्यक्तिंना प्राधान्य दिले पाहिजे. आरक्षणाचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.‘‘

भारतीय संविधानात सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या वर्गानुसार आरक्षण देण्याचे म्हटलेले आहे. मात्र, आज याचा राजकारणासाठी वापर करण्यात येतो. संविधानानुसार सर्व काही झाले असते, तर आज हे प्रश्न निर्माण झाले नसते, असे भागवत यांनी म्हटले आहे.

भागवत यांच्या वक्तव्यावर सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. जदयू नेते के. सी. त्यागी यांनी म्हटले आहे, की संविधानावर विश्वास असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी भागवत यांच्याविरोधात एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर म्हणाले, की आरएसएसने शेजारील देश नेपाळकडून शिकले पाहिजे. धर्म आणि जातीच्या आधारे कोणताही देश चालू शकत नाही. संघ सुरवातीपासूनच आरक्षणाच्या विरोधात आहे.