समता आणि बंधूतेच्या बळावरच देशाची प्रगती : मुख्यमंत्री

0
8

डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील निवासस्थान स्मारक म्हणून खुले

वृत्तसंस्था 

लंडन, दि.14 – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करुन महाराष्ट्र सरकारने आज या महान नेत्याला अनोखी मानवंदना दिली. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बाबासाहेबांनी संविधानात अधोरेखित केलेल्या समता आणि बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती होऊ शकेल, अशा भावना अभिप्राय स्वरुपात शब्दबद्ध केल्या.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले निवासस्थान स्मारक म्हणून सामान्य जनतेसाठी आज खुले करण्यात आले. या छोटेखानी पण ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कार्यक्रमाला या दोन्ही नेत्यांसह राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

लंडनमधील किंग हेन्री मार्गावरील या ऐतिहासिक वास्तूत पंतप्रधानांचे आगमन झाले, तेव्हा ‘जयभीम’च्या जयघोषांनी हा परिसर दुमदुमून गेला.श्री. फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी या निवासस्थानाला भेट दिल्यानंतर त्याठिकाणी ठेवण्यात आलेली दुर्मिळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तुंची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन केले. या वास्तुची पाच मिनिटे पाहणी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी बाहेर येऊन या स्मारकासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्याहीवेळी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पुन्हा एकदा ‘जयभीम’चा जयघोष सुरू झाला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवास्थानामुळे समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश कायम जगाला प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्हीजिटर बुकमध्ये नोंदविल्या. त्यात ते म्हणतात की, ‘एक ऐतिहासिक दिवस! भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण ग्रहण केले, ते घर आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या हस्ते स्मारक रूपाने जनतेकरीता खुले झाले आहे. समता आणि बंधूता या आधारावर समाज आणि देश प्रगती करू शकतो, हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून मा. बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. भारतमातेच्या या सच्च्या सुपुत्राला माझी वंदना. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र!’

पंतप्रधान मुंबईत इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांना या ऐतिहासिक निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनीही हे निमंत्रण सहर्ष स्वीकारुन त्यानुसार आपल्या लंडन दौऱ्यात त्यांनी या कार्यक्रमाचा समावेश केला आणि हा ऐतिहासिक दिवस आज संपूर्ण जगाला पहायला मिळाला.