उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

0
7

पोलिसपाटील पदभरती प्रकरण

देवरी- देवरी उपविभागात मोडणाऱ्या देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या पोलिसपाटील पदभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी निलंबित करण्याची शिफारस राज्य शासनाकडे केली आहे.
सविस्तर असे की, देवरी उपविभागातील देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यात नुकतीच रिक्त असलेल्या पोलिसपाटील पदांची भरती करण्यात आली. ही भरती एका खासगी एजंसी मार्फत घेण्यात आल्याची तक्रारी आमदार संजय पुराम यांना करण्यात आली. यामध्ये दलालांची नेमणूक करण्यात आल्याचा सांगून उपविभागीय अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. परिणामी, उच्चशिक्षित आणि पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. सदर पदांसाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि परीक्षेचे मूल्यांकन दोन्ही बाबींवर बोट ठेवत उपविभागीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस ना. बडोले यांनी आमदार पुराम यांच्या पत्राच्या आधारे शासनाला केली आहे. राज्य सरकार आमदार संजय पुराम आणि सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले यांच्या पत्राला खरोखर न्याय देते की, केराची टोपली दाखविते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.