नॅशनल हेराल्ड प्रकरण – सोनिया व राहूल जामिन न घेता जेलमध्ये जाण्याची शक्यता

0
5
नवी दिल्ली, दि. १६ – नॅशनल हेराल्डप्रकरणी शनिवारी ट्रायल कोर्टात उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेले सोनिया गांधी व राहूल गांधी जामिनासाठी अर्ज न करता तुरुंगात जाण्याचा मार्ग पत्करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गांधींनी केला असून आपला निरपराधीत्व सिद्ध करण्यासाठी तुरुंगात जाण्याचा मार्ग सोनिया व राहूल स्वीकारतील अशी चर्चा आहे.

 भाजपा नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्याखेरीज मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोडा व यंग इंडिया लि. या अन्य पाच आरोपींवर न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते.
नॅशनल हेराल्ड या जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेल्या वृत्तपत्राच्या मालकिची हजारो कोटी रुपयांची जमीन काँग्रेस पक्षाच्या निधीच्या वापरातून बळकावल्याचा आरोप पार्टीवर असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष या नात्याने सोनिया व राहूल गांधींना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी सूट न देण्याचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर हा राजकीय सूड उगवण्यात येत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. शनिवारी ट्रायल कोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी असून सोनिया व राहूल उपस्थित राहणार आहेत. मी इंदिरा गांधी यांची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही, असे आक्रमक वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले होते.
‘नॅशनल हेराल्ड’ हे दैनिक पं. जवाहरलाल नेहरु यांनी १९३८ मध्ये सुरु केले. कालांतराने ते डबघाईला आले व २००८ मध्ये त्याचे प्रकाशन कायमचे बंद झाले तेव्हा ते चालविणाऱ्या असोशिएडेट जर्नल्स या कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज होते.  ही कंपनी ज्या़ यंग इंडियन लि. कंपनीने ताब्यात घेतली त्यात सोनिया व राहुल गांधी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा डॉ. स्वामी यांचा दावा आहे.