महिला टीव्ही अँकरला धमकीचे 2000 कॉल्स

0
6

वृत्तसंस्था

मुंबई : प्रसिद्ध मल्ल्याळम टीव्ही न्यूज शोमध्ये महिषासूर जयंती निमित्त आयोजित चर्चासत्रानंतर  महिला टीव्ही अँकरला धमकीचे फोन आल्याचं वृत्त आहे. गेल्या शु्क्रवारी, ‘महिषासूर जयंती साजरी करणे हा देशद्रोह मानावा का’, या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सिंधू सुर्यकुमार या एशियानेट न्यूज टीव्हीच्या मुख्य समन्वयक संपादक आहेत. त्यांनी आपल्याला धमकीचे सुमारे 2 हजार फोन आल्याचा दावा केला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपल्याला शिवराळ भाषेत फोन केल्याचा आरोप सिंधू यांनी केला आहे.त्यानंतर त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली.पोलीसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केल्याचे वृत्त आहे.

‘दुर्गामातेला सेक्स वर्कर संबोधून त्यांचा अवमान केल्याचा आरोप माझ्यावर होत आहे. प्रत्येक मिनिटाला मला एक फोन येतो आणि धमकी दिली जाते. अनेकांनी मला वेश्या असं संबोधून शिवीगाळ केली. मी नेमका काय गुन्हा केलाय, हेही अनेकांना माहित नव्हते.’ असं सिंधू यांनी म्हटले आहे.ज्यांना सिंधू यांच्या मोबाईलवर संपर्क साधता आला नाही, त्यांनी एशियानेट न्यूज चॅनेलच्या कार्यालयात फोन करुन शिवीगाळ केली.

सिंधू यांच्या तक्रारीनंतर केरळ पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. अटकेतील 5 जण हे भाजप, संघ, किंवा श्रीरामसेनेयासारख्या हिंदुत्ववादी संघटनांशी निगडीत असल्याची माहिती तिरुअनंतपुरमचे पोलिस आयुक्त जी. स्पार्जन कुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिली आहे.

संघ ध्वनी नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका सभासदाने सिंधू यांचा फोन नंबर शेअर केला. आणि दुर्गामातेवरील एका फेसबुक पोस्टसाठी सिंधू यांना फोन करुन शिवीगाळ करण्यास सांगितल्याचं एका आरोपीने म्हटलं आहे.

 फेसबुक पोस्टची अफवा पसरवणाऱ्या आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर सिंधू यांचा नंबर शेअर करुन त्यांना शिवीगाळ करण्याचं आवाहन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.