अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप, तिघांची सुटका

0
8

वृत्तसंस्था
मुंबई,दि.2- औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणाती दोषी अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर इतर दोघांना 14 वर्षांची जन्मठेप व तिघांना आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने दिला आहे. यापैकी ज्‍या 3 जणांना 8 वर्षाची शिक्षा ठोठावली त्‍यांनी यापूर्वीच 10 वर्ष शिक्षा भोगली आहे. त्‍यामुळे त्‍यांची आता सुटका होणार आहे.
औरंगाबादजवळील वेरूळ येथे २००६ मध्ये जप्त केलेल्या अवैध शस्त्रसाठाप्रकरणी मुंबईवरील २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर- ए- तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा हस्तक सय्यद जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल आणि मोहम्मद आमीर शकील अहमद ऊर्फ आमिर शेख या दोघांसह बारा जणांना विशेष मोक्का न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले होते,
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळजवळ मे २००६ राेजी महाराष्ट्र एटीएस पथकाने धडक कारवाई करत टाटा सुमो आणि इंडिका कारमधून मोठा अवैध शस्त्रसाठा पकडला होता. तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विशेष मकोका न्यायमूर्ती श्रीकांत अणेकर यांनी नुकत्याच संपलेल्या अंतिम युक्तिवादानंतर हा निकाल दिला.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने कारवाई करून संशयित अतिरेक्यांना अटक केली. खुलताबाद , येवला मालेगाव येथून प्रचंड शस्त्रसाठा जप्त केला. एकूण २२ आरोपींना यात अटक झाली होती. सात अजूनही फरार आहेत. २०१३ मध्ये आर्थर रोड मोक्का न्यायालयात एटीएसने आरोपपत्र दाखलकेल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने २२ पैकी बारा आरोपींना दोषी ठरवले तर आठ आरोपींच्या विरोधात तपास यंत्रणा पुरेसे पुरावे सादर करू शकल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर इतर दाेन अाराेपींपैकी एक जण फरार अाहे तर दुसऱ्याला माफीचा साक्षीदार करण्यात अाले अाहे.
गुरूवारी निकाल वाचनानंतर दोषी ठरलेल्या सर्व आरोपींनी एकेक करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून आपली तुरूंगातील वर्तणूक पाहता शिक्षा कमी करण्याची तोंडी विनंती न्यायालयाला केली.