एसटी बस-टिप्पर अपघातात १६ जखमी

0
6

अमरावती- अमरावतीवरून चांदूर रेल्वेच्या दिशेने जाणारी अहेरी आगाराची भरधाव बस विरुद्ध दिशेने वाळू घेऊन येणारा टिप्पर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एसटीच्या चालक, वाहकांसह १६ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी आठ जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर इर्विनमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (दि. १) चांदूर रेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ घडला.

गंभीर जखमींमध्ये बसचालक बालाजी लक्ष्मण सोयाम (३५, रा. अहेरी),बसचे वाहक गंगाधर सुखदेवराव लाड (३०, रा. अहेरी), उषा राजू शिरसाठ (३५, प्रबुद्धनगर, वडाळी), प्रदीप महादेव शिंदे (३२, रा. तिवरा), सुंदरबाई महादेवराव शिंदे (६२, रा. तिवरा),नितेश कन्हैय्यालाल वादवानी (३५, रा. नानकनगर, अमरावती), उत्तम जयरामजी ठाकरे (६०, रा. चांदूर रेल्वे) आणि संध्या भीमरावजी इंगोले (४५, रा. वरोरा) या आठ जणांचा समावेश असून,अन्य आठ जण किरकोळ जखमी झाले आहे.

अहेरी आगाराची एम. एच. ४० एक्यू ६२४२ क्रमांकाची बस अहेरीवरून अमरावतीला आली होती. अमरावतीवरून चांदूर रेल्वे मार्गाने परत अहेरीला जात असताना चांदूररेल्वेच्या किलोमीटर अलीकडे बासलापूर गावाजवळील चमकुरा हॉटेलजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परसोबत बसची समाेरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, बसचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता. बसचे चालक सोयाम यांचे पाय त्यामध्ये फसले होते. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना कसेबसे बाहेर काढले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते. त्यापैकी जवळपास १६ प्रवाशांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अमरावतीला रवाना केले.