शेतकरी आत्महत्यांमध्ये 42 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

0
11

गोंदिया, दि. 6 -देशामध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून 2014 ते 2015 या वर्षामध्ये आकडा 42 टक्क्यांनी वाढला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 2014 मध्ये एकूण 5650 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. या आकडेवारीत मोठी वाढ झाली असून 8007 पर्यंत पोहोचला आहे.तर या आकडेवारीत महाराष्ट्र हा 3030 आत्महत्येसह पहिल्या क्रमांकावर आहे. देशभरातील अनेक राज्यांना 2014 आणि 2015 मध्ये सलग दोन वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातही शेतक-यांनी सलग दोन वर्ष दुष्काळाला तोंड दिले आहे.

फक्त एकट्या महाराष्ट्रात एकूण 3030 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. 37.8 टक्के शेतकरी आत्महत्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.त्यानंतर तेलंगणा दुस-या क्रमांकावर आहे. तेलंगणात 1358 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणामध्ये 1997 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून तिस-या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील एकूण सहा राज्यांमध्ये आत्महत्येची टक्केवारी 94.1 इतकी आहे.

काही राज्यांमध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या न केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मिझोरम, नागालँड आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2015 मध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या केलेली नाही.

शेतमजूरांच्या आत्महत्येतही महाराष्ट्रातील आकडा सर्वात जास्त आहे. एकूण 1261 शेतमजूरांनी आत्महत्या केली आहे. यानंतर मध्यप्रदेश 709 आणि तामिळनाडू 604 आत्महत्यांसह दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहे. देशभरातील आत्महत्येच्या आकडेवारी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये 12,360 जणांनी आत्महत्या केली होती. जो आकडा 2015 मध्ये 12,602 वर पोहोचला आहे.