मुलायम सिंहांच्या मृत्यूची वेळ आलीय, भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

0
7

नवी दिल्ली, दि. 30 – समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्यावर टीका करताना केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजपा नेते संजीव बलियान यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. मुलायम सिंह यांचा जगण्याचा काळ संपला असून त्यांच्या मृत्यूची वेळ आली आहे, असे वादग्रस्त विधान संजीव बलियान यांनी केले. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. तर वादग्रस्त विधानं करणा-या भाजपा नेत्यांच्या यादी आता संजीव बलियान यांचेही नाव जोडले गेले आहे.
‘मुलायम सिंह नेहमी सांप्रदायिकतेचं राजकारण करत आलेत, अशी टीका करत बलियान पुढे म्हणाले की, ‘मी त्यांना सांगू इच्छितो की आता मृत्यूची वेळ आली आहे. आता तर त्यांचा जगण्याचा काळ राहिला नाही. समाजवादी पार्टी या निवडणुकांमध्ये पूर्ण गाडली जाईल’. मथुरेतील छाता येथील रॅलीदरम्यान त्यांनी हे विधान केले.
उत्तर प्रदेशातील काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने केंद्रात असताना लुटलं आणि यांनी उत्तर प्रदेशला लुटलं, आता दोघंही मिळून उत्तर प्रदेशातील उरले-सुरलेही लुटतील, हेच मला सांगायचे आहे, असा टोलाही बलियानी यांनी सपा-काँग्रेस आघाडीवर हाणला. ‘उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास गुन्हेगार एकतर जेलमध्ये असतील किंवा राज्याबाहेर’, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच शेतक-यांसाठी हे सरकार असेल. आम्ही शेतक-यांना त्यांच्या पायावर उभे करू, असे आश्वासनही बलियान यांनी दिले.