परिचारिका या आरोग्य सेवांच्या अग्रभागी- राष्ट्रपती

0
59

महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली ,दि.13: परिचारिका या राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या अग्रभागी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ यांचा जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांच्या हस्ते देशभरातील 35 परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, आरोग्य सचिव सी.के. मिश्रा, वरिष्ठ अधिकारी, विविध शासकीय रूग्णालयातील परिचारिका उपस्थित होत्या.
राष्ट्रपती म्हणाले, परिचारिकांच्या योगदानावरच आरोग्य क्षेत्राचे यश अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील व्यवस्थेमध्ये परिचारिका, आरोग्यसेविका, आरोग्य सहायिका यांची भूमिका महत्वपूर्ण असून त्या कमी खर्चात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करतात. राष्ट्राला या सेवेचा गर्व आहे. 20 व्या तसेच 21 व्या शतकात आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळेच शहरी तसेच ग्रामीण जीवनमान उंचावले आहे. यासह माता मृत्यूदर, नवजात शिशू मृत्यूदर नियंत्रित करण्यामध्ये मोठे यश आले आहे.
आरोग्य सेवांमध्ये मानदंड ठरविणे ही काळाजी गरज आहे. ‘2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाची’ प्रशंसा करून यामध्ये नवनवीन शोध, संशोधन आणि आधुनिक काळाशी सुसंगत बदल सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परिचारिका या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भूमिका पार पाडीत आहेत. त्यामुळे व्यावसायिक विकास तसेच मनुष्यबळ विकास धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील 35 परिचारिकांना राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. हा पुरस्कार 1973 पासून प्रदान करण्यात येतो. मुंबईतील टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या नर्सिंग अधीक्षक श्रीमती स्वप्ना जोशी या मागील तीन दशकापासून परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी कॅन्सरग्रस्त बालकांसाठी विशेष कार्य केले आहे. बालकांना होणारे कॅन्सर (ऑन्कोलॉजी) यामध्ये श्री. जोशी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच या विषयांवर अधिक संशोधनासाठी त्यांनी ‘माय चाईल्ड मॅटर्स’ या प्रकल्पावर काम केले. सध्या त्या अन्य परिचारिकांना कॅन्सरग्रस्त बालकांना कशा पद्धतीने हाताळायला हवे याबाबत प्रशिक्षण देतात. ‘वैद्यकिय शस्त्रक्रिया नर्सिंग’ हे पुस्तक श्रीमती जोशी यांनी लिहिले आहे. तसेच ‘प्रसुती शास्त्रातील नर्सिंग’ या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक शोध प्रबंध सादर केलेले आहेत. श्रीमती जोशी या नोंदणीकृत परिचारिका तसेच नोंदणीकृत मिडवाईफ आहेत. त्यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका चंद्रकला चव्हाण यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामागील 32 वर्षांपासून आरोग्यसेविका म्हणून समर्पित तसेच उत्साही भावनेने काम करीत आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्रसुतिपूर्व आरोग्य विषयक जागरूकता आणि राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांचा गौरवही करण्यात आलेला आहे. कुशल बाळंतपण, नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रमातही त्या हिरिरीने भाग घेतात. स्थानिक पातळीवर आरोग्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जागरूकता केल्यामुळे 2013-14 मध्ये त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक प्रसूती झाल्याची नोंद आहे. आरोग्य क्षेत्रासोबतच त्या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्येही स्वयंस्फूर्तीने भाग घेतात.

जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील ढेकू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती कल्पना गायकवाड यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. ढेकू येथील आरोग्य क्षेत्रात मागील 28 वर्षांपासून त्या सेवा देत आहेत. प्रसुतीपूर्व तसेच प्रसुतीदरम्यान मातेची तसेच नवजात शिशुची काळजी यासह कुटुंब कल्याण या संबंधित त्यांनी सर्वाधिक कार्य केले आहे. केंद्र शासनाच्या सर्वच आरोग्य संबंधित कार्यक्रम त्या मोठ्या उत्साहाने राबवितात. त्यांच्या या कामाची प्रशंसा स्थानिक पातळीवरही करण्यात आली आहे.