देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून कोविंद यांनी घेतली शपथ

0
9

नवी दिल्ली,दि.25(वृत्तसंस्था) – देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. केहर यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी शपथ दिली. त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती आपल्या आसनांची अदलाबदल केली.शपथविधी सोहळ्याला देशाचे जवळपास सर्वच दिग्गज नेते,राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राष्ट्रपतिपदाची शपथ घेण्यापूर्वी कोविंद राजघाट येथे पोहोचले, तेथे यांनी त्यांच्या पूर्वसुरींप्रमाणे शपथविधीच्या आधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर यांनी राष्ट्रपती भवनाच्या लायब्ररीमध्ये मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.
शपथविधीचा छोटेखानी औपचारिक सोहळा संसद भवनाच्या मध्यवर्ती दालनात झाला. सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार कोविंद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती हे प्रजासत्ताकाचे राष्ट्रप्रमुख असल्याने त्यांच्या पदग्रहणास उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्री, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, सर्व घटकराज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि शंभरहून अधिक देशांचे भारतातील राजदूत व उच्चायुक्त उपस्थित होते.
रिवाजानुसार राष्ट्रपतींचे लष्करी सचिव कोविंद यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणापर्यंत घेऊन गेले.तेथे मावळते राष्ट्रपती मुखर्जी यांनी उत्तराधिकाऱ्यांचं स्वागत केले. त्यानंतर माजी आणि भावी असे दोन्ही राष्ट्रपती एकाच मोटारीत बसले व मोटारींचा ताफा दोघांनाही संसद भवनात घेऊन आला.
संसद भवनाच्या प्रवेशद्वारी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कोविंद यांचे स्वागत करून शपथविधीसाठी त्यांना केंद्रीय सभागृहात घेऊन गेले. पदग्रहणानंतर राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलाची तुकडी नव्या राष्ट्रप्रमुखांच्या मोटारीच्या अग्रभागी राहून त्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत नेण्यात आले.राष्ट्रपती भवनात आल्यावर मुखर्जी कोविंद यांना सोबत घेऊन ‘ग्रहप्रवेश’ करतील व नव्या राष्ट्रपतींना भवनाची सैर करत त्यांना राष्ट्रपतींचे कार्यालय असलेल्या अभ्यासिक दालनात घेऊन येतील. तेथे मुखर्जी यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यास राष्ट्रपतींच्या आसनावर आदरपूर्वक बसविले की नव्या राष्ट्रपतींच्या पदग्रहणाचा औपचारिक समारोप होईल. निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जी यांचे वास्तव्य १०, राजाजी मार्ग या बंगल्यात असेल. पदग्रहणानंतर कोविंद मुखर्जी यांना त्यांच्या नव्या घरी सोडून परत राष्ट्रपती भवनात येतील.
राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संबोधनात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यासह 8 दिग्गज नेत्यांची नावे घेतली. 125 कोटी देशवासियांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले आहे.राष्ट्रपती कोविंद म्हणाले, “महात्मा गांधींनी आम्हाला मार्ग दाखवला, तर सरदार वल्लभ भाई पटेल यांनी आमच्या देशाचे एकीकरण केले. डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी आम्हा सर्वांमध्ये मानवी आणि लोकशाही मूल्ये रुजवली. ते राजकीय स्वातंत्र्यावर संतुष्ट नव्हते. त्यांना कोट्यवधी लोकांचे आर्थिक स्वातंत्र्य हे त्यांचे लक्ष्य होते.” “सध्या साऱ्या जगात भारताचा दृष्टीकोन महत्वाचा आहे. साऱ्या जगाचे लक्ष्य आपल्याकडे लागले आहे. आपण झपाट्याने विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था आहोत. आपल्याला समान मूल्य असलेल्या संधी निर्माण कराव्या लागणार आहेत. असा समाज ज्याची कल्पना महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी केली होती.”असे म्हणाले.