मानवी तस्करीच्या दुर्दैवी चक्रातून बाहेर पडलेल्या तरुणीची पंतप्रधानांना राखी

0
9

मुंबई.( विशेष प्रतिनिधी )दि.09 – मानवी तस्करीच्या दुर्दैवी चक्रातून बाहेर पडून आता नोकरी करत सन्मानाने जगणाऱ्या मुंबईतील एका तरुणीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली. सोबतच स्वतः पत्र लिहून आपल्या आणि आपल्यासारख्या इत्तर मुलींच्या भावना ही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या आहेत. ‘तुम्ही आमचे भाऊ आहात, आज रक्षाबंधनच्या दिवशी मी तुम्हाला विनंती करते आहे आमची रक्षा करा, अजूनही या दुष्टचक्रात अडकलेल्या इतर बहिणींना यातून बाहेर काढा’ अशा भावना तिने आपल्या पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

मूळच्या कोलकाता येथील या तरुणीला फसवून मुंबईत आणण्यात आले होत. तस्करीला बळी पडलेल्या या तरुणीने ६ वर्ष यातना भोगल्या नंतर मुंबई पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तिची सुटका झाली. असामान्य धैर्य दाखवत नवं आयुष्य जगणाऱ्या या तरुणीचा नुकताच राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित महिला तस्करी बाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. राखी आणि पत्राच्या माध्यमातून या मुलीच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. महिलांची होणारी तस्करी ही अत्यंत अमानवी प्रथा असून ती रोखण्यासाठी राज्य महिला आयोग व्यापक उपाययोजना आणि प्रयत्न करीत आहे. पंतप्रधानांनीही आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले असून या मुलीच्या पत्र आणि राखीच्या माध्यमातुन महिला तस्करी, त्यातून त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि या अघोरी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या भावना पंतप्रधानांपर्यंत पोहोचविल्या आहेत.