विमानांचे अपहरण टाळण्यासाठी उपाययोजना

0
21

गोंदिया,दि.08 : काही वर्षांपूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व देशातील एखाद्या विमानतळावरून विमानाचे अपहरण झाले तर कोणत्या प्रकारच्या उपययोजना कराव्या, याचे प्रात्यक्षिक शुक्रवारी बिरसी येथील भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या विमानतळावर करण्यात आले.बिरसी विमानतळ समितीची सभा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. विमान कशाप्रकारे संपर्कात येवू शकते. अचानक त्या विमानाचे अपहरण कशाप्रकारे होते व अपहरणाचे कोडवर्ड याबाबतची माहिती या प्रात्यक्षिकातून देण्यात आली.
यावेळी धावपट्टीवर ३ रूग्णवाहिका, एक अग्निशमन वाहन, श्वानपथक, पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. कंट्रोलरूम येथून पोलीस अधीक्षकांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश बिनतारी संदेशातून प्रात्यक्षिक करणाºयांना दिले. यावेळी कंट्रोल रूममधून प्रात्यक्षिकांची पाहणी उपस्थितांनी केली.
जिल्हाधिकारी काळे यांनी बिरसी विमानतळ समितीची सभा घेतली. सभेला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, विमानतळचे संचालक सचिन खंगार, प्रविण गडपाल, अजय वर्मा, विनयकुमार ताम्रकार, संदीप पिंपळापुरे, देवेंद्र गौर, के.एस. राव, सोनवणे, ओ.एस. पशीने, रिंचेन डोलमा, विजय अहिरे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, बिरसी विमानतळ येथे सुध्दा २४ तास कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे. विमान अपहरणासारखी घटना या विमानतळावर होणार नाही, यादृष्टीने दक्ष असले पाहिजे. विविध भाषा जाणणारे व्यक्ती या समितीमध्ये असावे. विमानतळ प्राधिकरणाचा स्वतंत्र प्रसारमाध्यम अधिकारी नेमण्यात यावा, अशी उपयुक्त सूचनाही त्यांनी यावेळी केली.