रिझर्व्ह बँकेने जाहीर केली ४० थकबाकीदारांची यादी

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई,दि.31(वृत्तसंस्था)- देशात थकबाकीदार कंपन्यांसाठी नादारी प्रक्रिया संकेत (इन्सॉल्व्हन्सी कोड) लागू करण्याचा एक भाग म्हणून रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ४० बड्या थकबाकीदार कंपन्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत व्हिडिओकॉन, उत्तम गाल्वा, मॉनेट पॉवर, जयस्वाल्स निको या बड्या थकबाकीदारांचाही समावेश आहे. या कंपन्यांकडे प्रत्येकी ५००० कोटींची विविध बँकांची थकबाकी आहे. यापूर्वीे रिझर्व्ह बँकेने १२ बड्या थकबाकीदारांची पहिली यादी जून महिन्यात प्रसिद्ध केली होती. त्यात एस्सार स्टील, भूषण पॉवर, भूषण स्टील, लॅन्को इन्फ्राटेक, मॉनेट इस्पात इत्यादी कंपन्यांचा समावेश होता.
नादारी प्रक्रिया संकेत (इन्सॉल्व्हन्सी कोड) लागू झाल्यानंतर सर्व बँकांना आपल्या थकबाकीदारांविरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये वसुली दावा दाखल करावा लागतो. हा दावा दाखल होताच ट्रिब्युनल कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करते व इतर खासगी कंपन्यांकडून कंपनीचे परिचालन करण्यासाठी कर्जफेडीच्या अटीवर प्रस्ताव मागवते. यानंतर कंपनीचे परिचालन दुसरी कंपनी करते व कर्जवसुली होते. जर अशी कंपनी मिळाली नाही तर ट्रिब्युनल २७० दिवसांत थकबाकीदार कंपनी दिवाळखोरीत काढते व कर्ज वसुली करते.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार नादारी प्रक्रिया संकेतामुळे बँकांची कर्जवसुली लवकर तर होतेच पण औद्योगिक कर्ज पुरवठ्यामध्ये लक्षणीय वाढही होते. चीनमध्ये २००६ साली नादारी प्रक्रिया संकेत अमलात आला व तीन वर्षांत औद्योगिक कर्जपुरवठा ३० टक्के वाढला. असाच अनुभव पोलंड, स्पेन, कझाकिस्तान, यूएई इत्यादी देशांनाही आला आहे. त्यामुळे भारतातही नादारी प्रक्रिया संकेत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने मात्र या संकेताला विरोध केला आहे. या संकेतामुळे बँकांना बड्या थकबाकीदार कंपन्यांचे कर्ज माफ करण्याचे साधन उपलब्ध होते. गेल्या पाच वर्षांत भारतातील सर्व बँकांनी मिळून बड्या कंपन्यांचे २,४९,९२७ कोटी कर्ज माफ केले आहे असे एआयबीईएचे महासचिव सी.एच. वेंकटाचलम यांनी गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जूनमधील १२ थकबाकीदार…
एबीजी शिपयार्ड
आलोक इंडस्ट्रीज
अ‍ॅमटंक आॅटो
भूषण पॉवर
इलेक्ट्रोस्टील स्टील
ईरा ग्रुप
जेपी इंन्फ्राटेक
ज्योती स्ट्रेक्चर्स
लॅन्को ईन्फ्राटेक
मॉनेट इस्पात

आॅगस्टमधील १२ थकबाकीदार…
एशियन कलरकोटेड इस्पात
कॅस्टेक्स
ईस्ट कोस्ट एनर्जी
एस्सार प्रोजेक्टस्
जय बालाजी इंडस्ट्रीज
जयप्रकाश असोशिएटस्
जयस्वाल्स निको
मॉनेट पॉवर
नागार्जुन आॅईल रिफायनरी
आॅर्किड केमिकल्स
रुची सोया
एसईएल मॅन्यूफॅक्चरिंग
शक्ती भोग
सोमा एंटरप्रायजेस
ट्रान्सट्रॉय इंडिया
युनिटी इन्फ्राप्रोजेक्टस्
उषदेव इंटरनॅशनल
उत्तम गाल्वा
व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज
व्हिडिओकॉन टेलिकॉम
व्हिसा स्टील