आंबेडकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ

0
10

मुंबई,दि.19- –फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून विविध घोषणांचा धडाका लावला आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर इंदू मिलमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने केली. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये भूमिपूजनही करण्यात आले. परंतु २३ महिने झाले तरी स्मारकाचे काम पुढे सरकलेले नाही. कामास सुरुवात होत नसल्याने प्रकल्पाचा खर्चही १६६ कोटी रुपयांनी वाढून ४२४ कोटींच्या जागेवर ५९१ कोटी रुपयांवर गेल्याचे एमएमआरडीएने सांगितले. आरटीआय कायद्यांतर्गत एमएमआरडीएकडे इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर स्मारकाच्या कामकाजाबाबत माहिती मागवण्यात आली. माहितीनुसार, स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले आहे. इंदू मिल येथील स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८४१४.८३ चौरस मीटर असून सदर जागेचा ताबा एमएमआरडीएने शासनाच्या वतीने २५ मार्च २०१७ रोजी घेतला आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी १४ एप्रिल २०१७ रोजी रचना व बांधणे या तत्त्वावर निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरू होईल. यासाठी सुमारे ५९१ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येईल. या कामासाठी शासनाने आर्किटेक्ट मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट्स यांची नियुक्ती केली असून त्यांना आतापर्यंत ३.४४ कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे.