नोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना जीएसटी लागू करणे दुसरा धक्का होता – यशवंत सिन्हा

0
16

नवी दिल्ली,दि.28(वृत्तसंस्था) – भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला करत खडे बोल सुनावले आहेत. अगोदरच्या सरकारला आपण दोष देऊ शकत नाही, कारण आपल्याला पुरेपूर संधी मिळाली आहे असं सांगत यशवंत सिन्हा यांनी भाजपा सरकारला सुनावलं आहे. ‘अर्थव्यवस्था कमकुवत असताना नोटाबंदीचा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. अजून नोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना जीएसटी लागू करणे दुसरा धक्का होता’, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे. एएनआयला आज सकाळी दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं यशवंत सिन्हा यांनी सांगितलं. ‘अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे यामध्ये काही दुमत नाही. आम्ही नेहमी युपीएला जबाबदार धरत होतो. मात्र आता जेव्हा सत्तेत येऊन 40 महिने झाले आहेत, त्यानंतरही आधीच्या सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही’, असे खडे बोल यशवंत सिन्हा यांनी सुनावले आहेत.

शत्रुघ्न सिन्हांचा यशवंत सिन्हांना पाठिंबा

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडाडून हल्ला करणाऱ्या यशवंत सिन्हा यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत म्हटले आहे, की सिन्हा यांच्या सूचना नाकारणे बालिशपणा ठरेल. ते एक निष्ठावान राजकारणी आहेत. त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आरसा दाखवला आहे.बिहारचे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या अर्थधोरणावर दाखवलेला आरसा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, की त्यांनी (यशवंत सिन्हा) अर्थमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आरसा दाखवला असून समस्येच्या मुळावर घाव घातला आहे.