धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचे ओबामांचे मत दुर्देवी – केंद्रीय गृहमंत्री

0
20

भीमसमुद्रा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर जे विधान केले ते दुर्देवी असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त केले.
भारत दौ-याच्या अखरेच्या दिवशी सिरी फोर्ट सभागृहात भाषण करताना ओबामा यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यक्षपणे हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरु असलेल्या घरवापसी सारख्या कार्यक्रमावर टिका केली होती. भारतात धार्मिक तेढ वाढली तर, भारताचा विकास खुंटेल असे ओबामा आपल्या भाषणात म्हणाले होते.
तरलाबाळू मट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी धार्मिक स्वातंत्र्याचा जो मुद्दा उपस्थित केला तो दुर्देवी आहे. देशात घरवापसी सारख्या कार्यक्रमांना अजिबात थारा नाही. भाजपा सरकारचा पूर्णपणे धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असून, धार्मिक आधारावर लोकांचे विभाजन करणा-या प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत असे ते म्हणाले.
कुठलीही व्यक्ती किंवा संघटना धार्मिक तेढ निर्माण करत असेल तर, कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकार खपवून घेणार नाही असे राजनाथ म्हणाले. सर्व देशांबरोबर चांगले राजनैतिक संबंध ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. शेजारी देशांबरोबर असणारा सीमावाद, दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा निश्चितच फायदा होईल असे राजनाथ यांनी सांगितले