रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभा लढवणार

0
16

चेन्नई(वृत्तसंस्था)दि.31- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.रजनीकांत यांचा राजकीय पक्ष हा भाजपला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सहभागी होईल, अशीही अटकळ बांधली जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे सूतोवाच केले होते. माझ्या राजकारण प्रवेशाबाबत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. योग्य वेळ आल्यास निर्णय जाहीर करू, असंही रजनीकांत काही दिवसांपूर्वी बोलले होते. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते, असे सूचित करत, आपण राजकारणात उडी घेणार की नाही याचा निर्णय 31 डिसेंबर रोजी जाहीर करू, असे तमीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितले होते.नाताळानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या मेळाव्यात रजनीकांत म्हणाले होते की, राजकारणातील अडचणी मला माहीत आहेत. मला त्यांची कल्पना नसती तर मी राजकारणात यापूर्वीच उडी घेतली असती. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीही लागते. याआधी आपण सन 1996मध्ये द्रमुकला मते देऊन जयललिता यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले होते. त्याचा संदर्भ देत रजनीकांत म्हणाले, खरेतर मी त्याच वेळी राजकारणात उतरलो होतो. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही.