नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बना – राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद

0
33

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आर्थिक जनतंत्र परिषदेत प्रतिपादन

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बना असे प्रतिपादन भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित आर्थिक जनतंत्र परिषद (इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) या कार्यक्रमात तसेच विपश्यना समाजासाठी हितकारी असल्याचे मत देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्या 46 व्या व इलायची देवी गोयंका यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्ताने आभार दिवस हा कार्यक्रम बोरिवली गोराई येथील ग्लोबल पगोडा येथे व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आर्थिक जनतंत्र परिषदेत व्यवसायातील छोट्या मोठ्या संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना असा मंत्र देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिला. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो अशी अगतिकता असू नये; तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेल, स्वत:चा व्यवसाय सुरु करेल अशी भावना त्यामागे हवी. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’ सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्धल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे कौतुक केले. या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले 200 यशस्वी उद्योजक सुद्धा होते. दरम्यान राष्ट्रपती कोविंद म्हणाले की,  रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीमध्ये मी यापूर्वी 10 ते 12 वेळा आलो आहे ते विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी. एक तुमच्यासारखाच प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून तसेच आताचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी या संस्थेस कुठे कुठे भेट दिली, कसा राहिलो, कसा शिकत गेलो हे सगळे आठवले अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या या विनम्र आणि साध्या सरळ निवेदनाने भारावलेल्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.
तसेच ग्लोबल पगोडा येथे मानवसमाजाला हिंसेकडून करूणेकडे नेण्याची आवश्यकता असून बुद्धाने सांगितलेले विचार लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. हा विचार शिकविणारी विपस्स्यना साधना लोकांपर्यंत पोहचली पाहिजे कारण विपश्यनासाधेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाऱ्यांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या साधनेमुळे लाभ मिळत असल्याने विपश्यना साधना ही संपूर्ण समाजासाठी हितकारी असल्याचे मत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केले. राष्ट्रपती पुढे म्हणाले, विपश्यना पद्धती सोबत माझा पंधरा वीस वर्षांपूर्वी परिचय झाला. आज धम्म शिलेचे अनावरण करताना मला आनंद होत आहे. राज्यास अनेक उपलबद्धतेमुळे वैशिष्ठ प्राप्त झाले आहे. मात्र अध्यात्म आणि आस्था असलेल्या स्थळांमुळे राज्याला अधिक प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. जागतिक पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, बुद्धाचा इतिहासास प्रदर्षीत करणाऱ्या अजिंठाच्या लेण्या याची साक्ष आहे. बुद्धाने सांगितलेला करूणा भाव व्यक्त करणाऱ्या येथील मुर्त्या या जगाला करूणेचा संदेश देतात. आज मानवीसमाजाला करूणेची शिकवण मिळणे आवश्यक आहे. इगतपुरी येथील धम्म केंद्र, नागपूर येथिल ड्रॅगन पॅलेस व गोराई येथील जागतिक पगोडा या क्षेत्रामुळे जागतिक पर्यटक राज्यात आकर्षित होत आहेत. राज्य शासनाने शालेय विद्यार्थी, कारागृहांमधील कैदी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना विपश्यनेसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. केवळ दान दिलेल्या रकमेतून 16 एकर जागेवर पसरलेल्या या ग्लोबल पगोडाला गेल्या वर्षी 92 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. नव्या बांधण्यात येणाऱ्या धम्मालयाच्या शिलालेखाचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल डॉ. चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे यांनी आभार मानले. मिलिंद बेटावदकर आणि रवींद्र साठे यांनी सूत्रसंचालन केले.