माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

0
16

कोलकाता,दि.13(वृत्तसंस्था)- माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळेसोमनाथ चॅटर्जी हे व्हेंटिलेटरवर होते.
सोमनाथ चॅटर्जी यांना गेल्या अनेक दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर देखरेख ठेवून होती. सोमनाथ चॅटर्जी यांनी सीपीएम पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सन 1968 ते 2008 पर्यंत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता ते नेता म्हणून सक्रियपणे कामकाज पाहिले. तर 1971 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनून संसदेत पोहोचले. तब्बल 10 वेळा ते खासदार राहिले आहेत.
दरम्यान, सन 2008 साली भारत-अमेरिका परमाणू करार विधेयकावेळी सीपीएमने तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारचे समर्थन काढून घेतले होते. त्यावेळी, सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे सभापती होते. यावेळी पक्षाने त्यांना सभापतीपद सोडण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे सीपीएमने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली होती.