जिल्ह्यातील सर्व कृषी पंपांना तीन महिन्यांत विद्युत जोडणी

0
10

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विद्युत समस्या निवारणासाठी राज्याचे ऊर्जामंत्री बावणकुळे यांनी नागपूर येथे आ. गोपालदास अग्रवाल व सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली.
या वेळी आ. अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित कृषी पंपांना विद्युत जोडणीचा विषय ऊर्जामंत्र्यांसमोर ठेवला. त्याकडे लक्ष देत ऊर्जा मंत्री बावणकुळे यांनी गोंदिया जिल्ह्यात सर्वे करून सर्व प्रलंबित शेतकर्‍यांची यादी तयार करून पुढील तीन महिन्यांच्या आत वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले.
आ. अग्रवाल यांच्या मागणीवरून १५ डिसेंबर २0१४ नंतर अनधिकृत कृषी पंपांची वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम रद्द करून सदर रक्कम शेतकर्‍यांच्या पुढील वीज बिलात माफ करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे १३२ केव्हीए व काटी येथे ३३ केव्हीए या नवीन उपकेंद्रांच्या स्थापनेला ऊर्जा मंत्री बावणकुळे यांनी मंजुरी दिली. तसेच कमी दाबाची समस्या सोडविण्यासाठी आमगाव येथे सध्याचे ५0 केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढवून ७५ केव्ही करणे, गोंदिया एमआयडीसी (मुंडीपार) येथील ट्रॉन्सफॉर्मरची दुरूस्ती व व्यवस्थेचे निर्देशही बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी दिले. गोंदिया शहरात माताटोली-रिंगरोड परिसरातील कमी व्होल्टेजच्या समस्या सोडविण्यासाठी दोन नवीन ३३ केव्हीए विद्युत सब स्टेशन स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यातील राईस मिल उद्योगाच्या समस्या ऊर्जा मंत्र्यांना सांगत आ. अग्रवाल यांनी राईस मिलवर लागत असलेले अधिक एम.डी. चार्जला व्यावहारीक व कमी करण्याची मागणी केली. तसेच शहरी क्षेत्रात २00 एचपीपर्यंत लो-टेंशन कनेक्शन व ग्रामीण क्षेत्रात केवळ १0७ एचपीपर्यंत लो-टेंशनची पद्धती बदलवून यात समानता आणण्याची मागणी ऊर्जा मंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. त्यावर त्वरित ऊर्जा मंत्र्यांनी फोनवरून विद्युत मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली व ती दुरूस्त करण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मंजुरी घेण्याचे निर्देश दिले.
१ एप्रिल २0१५ पासून औद्योगिक विद्युत दरात एक हजार ७0 रूपये प्रति युनिटची कमी करण्याची माहितीसुद्धा ऊर्जा मंत्री बावणकुळे यांनी बैठकीत दिली.
या वेळी प्रामुख्याने आ. गोपालदास अग्रवाल, राईस मिलर्स असोसिएशनचे हुकूमचंद अग्रवाल, महेश अग्रवाल, विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता बापट, अधीक्षक अभियंता फुलकर, कार्यकारी अभियंता भवरे यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते.