महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य

0
12

वृत्तसंस्था/नवी दिल्ली,दि.0७ः-स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २0१९’ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राने हा सन्मान मिळवला आहे. या यादीत पहिला क्रमांक छत्तीसगडचा लागतो तर दुसर्‍या क्रमांकावर झारखंड आहे. मध्य प्रदेशमधील इंदुर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदुरने हा मान सलग तीनवेळा मिळवला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हे निकाल घोषित केले. हे सर्वेक्षण देशातील ४,२३७ शहरांमध्ये करण्यात आले. २८ दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपतींनी जाहीर केले. शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव आणि महाराष्ट्रातील स्वच्छ भारत मिशनच्या संचालक मनीषा म्हैसकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
राज्यातल्या शहरांच्या बाबतीत कोल्हापूर स्वच्छ सर्वेक्षणात १६ व्या स्थानावर आहे. पहिल्या २0 शहरांमध्ये कोल्हापूर नवी मुंबईनंतर राज्यातील दुसरे शहर ठरले आहे. नाशिक राज्यात १३ व्या तर देशात ६७ व्या क्रमांकावर आहे. नाशिकची ६३ व्या क्रमांकावरून ६७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे