भंडारा,दि.0७ः- अशोक लेलँड कंपनीविरोधात राजेगाववासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाची जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात येताच मुख्य चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला बळीराजा पक्षाच्या तृतीयपंथीयांनी पाठींबा देत आपला सहभाग नोंदविल्यामुळे शेवटी या संदर्भात आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून राजेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचा अनिता शेंडे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भोयर यांच्या नेतृत्वात अशोक लेलँड कंपनीने केलेल्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनासोबत पाठपुरावा सुरू आहे. परंतु, प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. गावकर्यांनी अनेक मोर्चे, रास्तारोको आंदोलन केले. मागील चार दिवसांपासून गावकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली. दरम्यान, आज पाचव्या दिवशी विविध संघटना व पक्षांनी आंदोलनाला पाठींबा दिला. बळीराजा पार्टीचे प्रदेश महासचिव नरेंद्र पालांदूरकर यांनी जिल्हा प्रशासनाचा निषेध करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, बळीराजा पार्टीचे विदर्भ प्रमुख किन्नर उत्तम बाबा यांच्या नेतृत्वात स्नेहा प्रधान, नागपूर शहर अध्यक्षा किन्नर सलोनी अंसारी, मोहम्मद शेहजाद, बेबो उत्तम सेनापती, मुस्कान जान, शावनी जान, ममता जान, जारा जान, पलक जान, झोया जान, राणी जान यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तथापि, अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस ताफा पाठविण्यात आला.
आंदोलनाची दखल घेत ७ मार्च रोजी शशिकांत भोयर, उत्तम बाबा, नरेंद्र पालांदूरकर, अचल मेर्शाम, कुंजन शेंडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी डॉ. पांचाळ, तहसीलदार पोयाम यांनी दिले.





