भूसंपादनावरील नव्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी

0
7

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि.३ -राज्यसभा संस्थगित केल्यानंतर केंद्र सरकारने भूमी अधिग्रहणावर जारी केलेल्या नव्या अध्यादेशाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज शुक्रवारी मंजुरी दिली.
लोकसभेत पारित झालेले भूमी अधिग्रहण विधेयक सरकारला राज्यसभेत बहुमताच्या अभावामुळे मंजूर करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे सरकारने गेल्या वर्षी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता. विधेयकाची मुदत येत्या पाच एप्रिल रोजी संपणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी विधेयकाचा मार्ग रोखून धरल्याने सरकारला अखेर राज्यसभेचे कामकाज संस्थगित करून नव्याने अध्यादेश जारी करणे भाग पडले.
गेल्या मंगळवारी झालेल्या संसदीय कामकाजावरील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्याने अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सरकारने अध्यादेश काढून तो राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला आणि राष्ट्रपतींनी आज शुक्रवारी त्यावर आपली मोहर उमटवली. यामुळे सरकारला आता या विधेयकासाठी तूर्तास राज्यसभेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही.