सातव्या आर्थिक गणनेचे राज्यस्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण

0
22

मुंबई, दि. 30 : देशभरात 7 वी आर्थिक गणना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) e-governance यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे. या गणनेत देशातील आर्थिक कार्याची आणि उलाढालींची माहिती घरोघरी जाऊन तसेच विविध आस्थापनांना भेटी देऊन गोळा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने अखिल भारतीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण दि. 14 मे 2019 रोजी नवी दिल्ली येथे पार पडले असून आता महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण दि. 1 जून 2019 रोजी सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत ग्रामविकास भवन, सेक्टर 21, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित केले आहे.
राज्यात कार्यरत असलेल्या CSC केंद्रातून नेमलेले प्रगणक घरोघरी तसेच आस्थापना ज्या ठिकाणी असतील तेथे भेटी देऊन मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणार आहेत. सदर गणनेचे पर्यवेक्षण राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाचे (NSSO) अधिकारी व राज्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अधिकारी करणार आहेत.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे मा. संचालकांसह मुख्यालयातील सह संचालक, सर्व प्रादेशिक कार्यालयाचे सह संचालक, सर्व जिल्हा सांख्यिकी अधिकारी आणि राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाचे (NSSO) अधिकारी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) e-governance चे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत असे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.