दिल्लीत आपच्या रॅलीत शेतक-याने केली आत्महत्या

0
6

नवी दिल्ली – भूसंपादन विधेयकाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या आपच्या आंदोलनात एका शेतक-याने झाडावर गळफास घेत सर्वांसमक्ष आत्महत्या केली. दुर्दैवी बाब म्हणजे हा शेतकरी झाडावर चढल्यावर एकानेही त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने गळफास घेतल्यावर तिघा जणांनी झाडावर चढून त्याला खाली उतरवले मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

भूसंपादन विधेयकाविरोधात बुधवारी आम आदमी पक्षातर्फे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राजस्थानचे गजेंद्र सिंह हे शेतकरीही आले होते. दुपारी दिडच्या सुमारास गजेंद्र सिंह हे झाडावर चढले व त्यांनी आत्महत्येची धमकी द्यायला सुरुवात केली. आप नेते कुमार विश्वास यांनी मंचावरुन संबंधीत व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्यांनी कुमार विश्वास यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत गळफास घेतला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी तिघांनी झाडावर चढून गजेंद्रसिंह यांना खाली उतरवत दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गजेंद्रसिंह यांची प्राणज्योत मावळली होती.