भाजप आमदाराची पोलिस हवालदाराला मारहाण

0
14

वृत्तसंस्था
हैद्राबाद – विवाह समारंभात विनापरवाना मोठ्या आवाजातील मिरवणूक थांबविल्याने एका पोलिस हवालदाराला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदाराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शुक्रवारी रात्री दोन वाजता परवानगी न घेता एका विवाहसोहळ्यादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात येत होता. स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. काही वेळातच शेखर नावाचा एक हवालदार तेथे आला. आणि त्याने डीजेची वायर कापून आवाज थांबविला. दरम्यान चिडलेल्या वऱ्हाडींनी मंगलघाटचे आमदार राजा सिंह यांना घटनास्थळी बोलाविले. सिंह आल्यानंतर त्यांनी शेखर यांना याचे भयंकर परिणाम होतील अशी धमकी देत मारहाण केली. या घटनेचे संपूर्ण चित्रण कॅमेरामध्ये बंद झाले असून पोलिस त्याचे फुटेज मिळवित असल्याची माहिती पोलिस उपायुक्त वेंकटेश्‍वरा राव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. संबंधित हवालदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आमदार राजा सिंह यांच्यावर कलम 353, 506 आणि 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही राव यांनी पुढे सांगितले. आमदाराला अटक करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. असे म्हणत “आम्ही आमदाराला नोटीस पाठविली असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येईल‘ असेही सिंह पुढे म्हणाले.