धानाच्या हमीभावात ५0 रुपये वाढ करण्याची सीएसीपीची शिफारस

0
13

नवी दिल्ली दि.3: कृषी खर्च आणि दर ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सीएसीपी आयोगाने सरकारच्या धान खरेदीसाठी किमान हमीभाव प्रति क्विंटल ५0 रुपये वाढवून १४0१ रुपये करण्याची शिफारस केली आहे. याचप्रमाणे नाचणीच्या हमीभावात प्रती क्विंटल १00 रुपये वाढ करण्याची शिफारस केली आहे. या वाढीनंतर नाचणीचा हमीभाव प्रती क्विंटल १६५0 रुपये हाईल. तसेच भुईमुगाचा हमीभाव ३0 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ४0३0 रुपये करण्याची शिफारस केली आहे.

सीएसीपीने २0१५-१६ सालासाठी विविध पिकांचा हमीभाव ठरविण्याचा अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाला नुकताच सादर केला. सरकार शेतकर्‍यांकडून विविध प्रकारच्या अन्नधान्यांची खरेदी याच हमीभावानुसार करते. धान म्हणजे भातशेती हे भारतातील खरीप हंगामाचे प्रमुख पीक आहे. खरीप हंगामातील पेरण्या जून महिन्यात नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनापासून केल्या जातात. २0१४-१५ खरीप हंगामात देशभरात एकूण १0.३ कोटी टन तांदूळ उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते, तर आधीच्या वर्षी खरीप हंगामात देशभरात १0.६ कोटी टन तांदूळ उत्पादन घेण्यात आले होते. धान खरेदीच्या किमान हमीभावात वाढ केल्यास शेतकरी अधिक भातशेती करतील, असा सरकारचा तर्क आहे. यामुळे केंद्र सरकार राज्य शासनांच्या इतर विभागांतील अधिकार्‍यांसोबत या प्रस्तावावर चर्चा करीत असल्याची माहिती कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. राज्यांकडून माहिती मिळाल्यानंतरच हमीभाव वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. मागील खरीप हंगामातदेखील सरकारने धानाच्या हमीभावात प्रती क्विंटल ५0 रुपये वाढ केली होती. त्यानंतर धानाची हमीभाव प्रति क्विंटल १३६0 रुपये झाला होता.