ज्येष्ठ संगीतकार एम. एस. विश्वनाथन काळाच्या पडद्याआड

0
5

चेन्नई- सुप्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार एम. एस. विश्वनाथन (एमएसव्ही) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीत सुमारे १ हजार ७०० चित्रपट संगीतबद्ध केले. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य संगीतक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
वयोमानानुसार होणारे आजार आणि श्वसनाच्या आजारामुळे त्यांच्यावर फोर्टीस मालार या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी मंगळवारी पहाटे साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एमएसव्ही यांना चार मुले आणि तीन मुली आहेत.
एमजी रामचंद्रन यांची प्रमुख भुमिका असलेल्या जेनोवा या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्याआधी त्यांनी बाल कोवालन याची बाल भुमिकाही साकारली होती. ख-या अर्थाने त्यांनी १९५२ साली ‘पणम’ या तमिळ चित्रपटापासून संगीतकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. कोणत्याही पिढीजात संगीताची पार्श्वभूमिका नसलेल्या एमएसव्ही यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. त्यांनी एनटी रामा राव, एमजी रामचंद्रन, एम. करुणानिधी आणि जयललिता या चार मुख्यमंत्र्यांसह काम केले आहे.