ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक – अलियाक्सांद्र मात्सुकोऊ

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 20: बेलारूस भारतासोबत व्यापार, व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे. या दृष्टीने बेलारुसमधील ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्राशी ‘भगिनी राज्य’ सहकार्य करार करण्यास प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबईतील बेलारुसचे नवनियुक्त वाणिज्यदूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ यांनी दिली.

बेलारुसने मुंबई येथे प्रथमच आपला स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु केला असून पहिले वाणिज्यदूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ यांनी मंगळवारी (दि. १९) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मात्सुकोऊ यांनी राज्यपालांना सांगितले की नुकतीच बेलारुसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी ब्रेस्ट प्रांत – महाराष्ट्र प्रादेशिक सहकार्याच्या चौकटीवर चर्चा झाली.

यावेळी वाणिज्य दूतांनी राज्यपालांना सांगितले की, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे भारतासोबत घनिष्ट संबंध विकसित करण्याबाबत आग्रही असून त्यांचा भारत दौऱ्यावर येण्याचा मानस आहे. त्यादरम्यान ते महाराष्ट्रालाही भेट देतील.

बेलारुस सोविएत युनियनचा भाग असताना आपल्या देशाचे भारतासोबत संबंध अतिशय घनिष्ट होते. हे संबंध आता पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी बेलारुस उत्सुक असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

रशियाचा शेजारी असलेला बेलारुस हा देश भारतासाठी युरोपियन युनियन आणि रशियन फेडरेशन यांच्यातील पूल म्हणून काम करू शकतो, असे सांगून बेलारुस मुंबईला वाहतूक व्यवस्थापनात मदत करु शकतो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राशी मानवतावादी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने बेलारूस सरकार पुण्याजवळील एका अनाथाश्रमातील ३० मुलांना सहलीसाठी बेलारुसला नेणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

बेलारुसमध्ये भारतीय संस्कृती, विशेषत: भारतीय संगीत, नृत्य, योग आणि चित्रपट खूप लोकप्रिय असल्याचे सांगून आपला देश लवकरच नवी दिल्ली तसेच मुंबई येथे सांस्कृतिक दिन सोहळ्याचे आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बेलारुसच्या महावाणिज्य दूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल श्री. बैस यांनी महाराष्ट्र आणि बेलारुसमधील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थी-आदान प्रदान, प्राध्यापक आदान प्रदान तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवी दिल्ली आणि राजधानी मिन्स्क दरम्यान थेट विमानसेवा सुरू झाल्याने यानंतर उभयपक्षी पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.