विकास आराखड्यात दस्तऐवज छेडछाड प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करा

0
6

छत्रपती संभाजीनगर,दि. 20: छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश करुन मंजूर आराखड्यातील ना-विकास क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात छेडछाड करुन व दस्तऐवजांचे बनावटीकरण करुन अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या गैरप्रकारामुळे शासनाची आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. याबाबत आपल्या स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी नगररचना विभागाच्या संचालकांना कळविले आहे.

औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (AMRDA) कार्यालयामध्ये कार्यरत असणारे नगररचना विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपरोक्त बाबींना आळा बसावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्राप्त प्रकरणांची चौकशी करणे व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे इत्यादी प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. स्वतःहून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने अथवा संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केल्या जात नसल्याने मंजूर आराखड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुचित फेरबदल होत असल्याने विकास आराखड्याचा मूळ उद्देश साध्य होणार नाही, अशी आपली धारणा असल्याचेही विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांनी संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महानगराबाबतीत अत्यंत महत्त्वाचा विषय हा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 शी निगडीत असल्याने व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने तसेच वरील गैरप्रकारामुळे शासनाची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. महानगराच्या नियोजनबद्ध विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनास प्रतिकूल ठरत असल्याची शक्यता व्यक्त करून याबाबत आपल्या स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असेही श्री. अर्दड यांनी म्हटले आहे.