पंकजा मुंडे ठरल्या अव्वल दांडीबहाद्दर मंत्री

0
14

माहिती अधिकाराखाली मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुपस्थितीची माहिती उघड

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना सोडले तर इतर मंत्री मंत्रिमंडळाच्या बऱ्याच बैठकांना गैरहजर राहिल्याचा प्रकार महितीच्या अधिकारातून समोर आला आहे. ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्वाधिक दांडी मारल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे,एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि राजकुमार बडोले हेही या पंक्तीत सामील आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2014 पासून जून 2015 या कालावधीत एकूण मंत्रिमंडळाच्या 28 बैठकी झाल्या आहेत. त्यापूर्वी 8 बैठका झाल्या होत्या, पण त्या वेळी पूर्ण मंत्रिमंडळाची स्थापना झाली नव्हती.

मुख्यमंत्री तथा अन्य 17 मंत्र्यापैकी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा अपवाद वगळता 16 मंत्री अनुपस्थित होते. यामध्ये पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावित 28 पैकी 9 वेळा अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत 6, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार 5, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले 5, गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता 4, पर्यावरणमंत्री रामदास कदम 4, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे 3, महसूलमंत्री एकनाथ खडसे 3, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे 3 यांची क्रमवारी आहे.

मंत्रिमंडळाच्या किती बैठकांत सलग गैरहजर असल्यास पद रद्द होते, याबाबतीत कोणताही नियम नसल्याची माहिती सांगितल्याचे माहिती अधिकारात माहिती विचारणारे अनिल गलगली यांनी सांगितले आहे.