बिहारमध्येही संघ भाजपच्या पाठीशी

0
3

पाटणा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता लोकसभा निवडणुकीप्रमाणे बिहारमधील विधानसंभेच्या निवडणुकीत भाजपच्या कमळाला बळ देण्याचा निर्धार केला आहे. लालू-नितीशकुमारांच्या महाआघाडीला धूळ चारण्यासाठी संघाने रणनीती तयार केली असून, खास विश्वासू प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. संघाने बिहारचे चार विभाजन केले असून, त्यासाठी स्वतंत्र प्रचारकही नेमले आहेत. ज्या मंडळींनी प्रतिकूल स्थितीमध्ये संघटनवाढीसाठी प्रयत्न केले, अशा लोकांचा यामध्ये समावेश आहे.

विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनच संघाचे व्रज प्रांताचे प्रचारक दिनेशजी यांना भाजपमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्याकडे प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार आहे. संपूर्ण प्रचार यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटणा, मुझफ्फरपूर, सुपौल आणि बेगुसरायमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केले जाणार आहेत. भाजपचे सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अनंतकुमार आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली संघाची निवडक मंडळी काम करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांचे नियोजन या नेत्यांकडे असेल. याच महिन्यामध्ये मोदींच्या तीन सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

संघाचे प्रचारक शिवनारायण यांच्याकडे राज्याचा ईशान्येकडील भाग, पवन शर्मांकडे वायव्य भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पवन शर्मा यांनी दिल्ली भाजपमध्येही काम केले आहे. ते पूर्वीपासून संघात सक्रिय आहेत. बिहारच्या नैर्ऋत्य भागाची जबाबदारी राजेंद्रसिंह, तर आग्नेय भाग सी. आर. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंडमधील धडाकेबाज कार्यकर्त्यांनाही प्रचारात उतरविण्यात आले आहे.