भाजप सरकारवर काँग्रेसचे तोंडसुख

0
13

गोंदिया दि. २८ : केंद्रातील नरेंद्र असो की राज्यातील देवेंद्र, यांची छाती ५६ इंचाची असेल, पण त्यात मोठय़ा शरीरात मनाचा मोठेपणा नाही, विश्‍वास नाही. विकासाच्या नुसत्याच गप्पा करीत ‘नाटकबाजी’ आणि फोकनाड्या मारणारे हे नेते केवळ शब्दांचे जाळे टाकू शकतात. पण देशाला ‘मन की बात’ नाही, तर ‘कल की बात’ची गरज आहे, अशी घणाघाटी टिका माजी शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी येथे आयोजित काँग्रेसच्या धरणे आंदोलनातदरम्यान केली.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी येथील जयस्तंभ चौकात गुरूवारी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते वसंत पुरके यांच्यासह माजी आ.रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सभापती पी.जी. कटरे, विमल नागपुरे, सहेसराम कोरोटे, नामदेवराव किरसान, अशोक लंजे, झामसिंग बघेले, दीपक पवार आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री पुरके यांनी पंतप्रधान मोदींना चांगलेच लक्ष्य केले. ‘विश्‍वपर्यटक पंतप्रधान’ अशी उपहासात्मक टिका करताना त्यांनी मोदींच्या ‘मेक इन इंडिया, बिलिव्ह इन इंडिया, स्टँड अप इंडिया’ अशा घोषणांची टर उडविली. भाजप सरकारने जनधन योजना, निर्मल ग्राम योजना अशा अनेक जुन्याच योजना नवीन नाव देत समोर केल्या आहेत. या सरकारला खरा विकास करायचा नसून देशाचे भले करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच असल्याचे ते म्हणाले. मनात दैववाद निर्माण करायचा आणि दिशाभूल करायची हेच विद्यमान सरकारचे ध्येय आहे. आता त्यांनी काहीही केले तरी त्यांना झेलावे लागणार असे पुरके म्हणाले.