विधान परिषदेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी

0
11
नागपूर  दि-८– राज्यात येत्या 27 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी झाल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, नागपुरातील उमेदवाराबाबत उत्सुकता कायम ठेवली.
गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. सोमवारी सकाळी नागपुरात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. जागा वाटपाचाही तोडगा काढण्यात आला असून, आठपैकी चार जागांवर कॉंग्रेस तर तीन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस नागपूरसह धुळे-नंदुरबार, मुंबईतील एक जागा तसेच कोल्हापूर येथील जागांवर तर सोलापूर, अकोला-बुलढाणा, नगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार आहे. संख्याबळ नसल्याने मुंबईतील दुसऱ्या जागेवर कॉंग्रेस लढणार नाही. उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसांत स्पष्ट करण्यात येतील. प्रदेश कॉंग्रेसने उमेदवारांची नावे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीकडे पाठविली आहेत, असे ते म्हणाले.