भाजपातर्फे राज्यात दुष्काळ निवारण समित्या

0
8

नागपूर दि, १४-दुष्काळाच्या झळा बसलेल्या गावांच्या मदतीसाठी व त्यांच्यासाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने होत आहे का, याची देखरेख करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सोमवारी केली.

भाजपाची प्रदेश प्रमुख पदाधिकारी बैठक नागपूर येथे झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना मा. रावसाहेब पाटील दानवे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्घाटनपर भाषण झाले. बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, सहप्रभारी खा. राकेश सिंहजी, राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व नागपूरचे महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.

रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, राज्यात मराठवाडा विदर्भासह अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा जाणवतात. भाजपातर्फे दुष्काळग्रस्त जनतेला मदत करण्यासाठी व सरकारी कामांची योग्य अंमलबजावणी होत आहे, याची देखरेख करण्यासाठी जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर पक्षाच्या समित्या लवकरच नेमण्यात येतील. राज्यामध्ये भाजपाचे खासदार व आमदार अशा सुमारे दोनशे मान्यवरांना विविध जिल्ह्यातील मंडलांची जबाबदारी देण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सरकारने गेल्या एक वर्षात चांगले काम केले आहे. भाजपाच्या पक्ष संघटनेने सरकार व जनता यामध्ये दुवा बनून सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचावावे तसेच जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात.व्ही. सतीश म्हणाले की, पक्ष संघटनेत नव्या नियुक्त्या करताना गुणवत्ता असलेल्या व पक्षासाठी परीश्रम करण्याची तयारी असलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. सरोज पांडे म्हणाल्या की, भाजपाच्या केंद्र सरकारने व राज्य सरकारने केलेल्या विविध कामांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माहिती ठेवणे आवश्यक आहे. ही माहिती आत्मविश्वासाने लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल पक्ष प्रवक्ते गिरीश व्यास यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. शेतकरी नेते शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.