“दादागिरी फक्त राज ठाकरेंना करता येते असं…”; भोंग्यांवरुन रामदास आठवलेंचा रोखठोक इशारा

0
36
रामदास आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना साधला निशाणा (फाइल फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या महिन्याच्या सुरुवातील गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात दिलेलं भाषणामधील मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असं असतानाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंची ही भोंगाविरोधी भूमिका संविधानाविरोधात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर राज ठाकरेंची दादगिरी सुरु असल्याचं भाष्य करत त्याला उत्तर देण्यासंदर्भातही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली.राज्याच्या राजकारणामध्ये सध्या केंद्रस्थानी असलेल्या भोंग्याच्या विषयांवरुनही आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. “भोंगे काढण्याचा विषय राज ठाकरेंनी करु नये. भोंगे काढण्याची सोंगं राज ठाकरेंनी करु नये. दादागिरी फक्त आपल्याला (राज ठाकरेंना) करता येते असं अजिबात नाहीय. दादगिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशापद्धतीची भूमिका त्यांनी घेऊ नये. भोंगे काढलेच नाही तर अशाप्रकारचा धमकी वजा इशारा देणं चुकीचं आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लीम धर्मियांचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी आहे,” असंही आठवलेंनी म्हटलं.

“मंदिरांवर ज्यांना भोंगे लावायचे आहेत त्यांनी लावावेत. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव असतो, भीम जयंती, शिवजयंती असते तेव्हा मोठे डीजे असतात. त्याचा मुस्लिमांना त्रास होतो. मात्र त्यांची याबद्दल काही अजिबात तक्रार नाहीय. त्यामुळे अजानसंदर्भात भोंगे काढण्याची ही भूमिका आहे ती संविधानाच्याविरोधात आहे. ही भूमिका आहे ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा,” असं मत आठवलेंनी व्यक्त केलंय.

“पूर्वी त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग, भगवा रंग, हिरवा रंग, पांढरा रंग असे सगळे रंग होते. त्यामुळे आता त्यांचे रंग बदलतायत हे बरोबर नाहीय. सगळ्या रंगाना घेऊन पुढे जायचं आहे, एखाद्या रंगाला घेऊन पुढे जाण्याचा विषय नाहीय,” असा टोलाही आठवलेंन लगावला. पुढे बोलताना, “आम्हाला भगवा रंग प्यारा आहे. भगवान गौतम बुद्धांनी भगव्या रंगाला फार महत्व दिलं होतं. त्यामुळे भगव्या रंगाबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो भगवा पडतो त्याने त्याने मुघलांना आणि दुश्मनांना चारी मुंड्या चीत केलं होतं. त्यामुळे भगवा घ्यावा. पण वाद होण्यासाठी तो अंगावर घेऊ नये. समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी काम करणं आवश्यक आहे,” असं आठवले म्हणाले.