ओबीसी आरक्षणप्रकरणी खा. अशोक नेते यांचे आ.विजय वडे्टीवारांना आव्हान

0
10

गडचिरोली, -: जिल्हयातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी कोणता पाठपुरावा केला, ते सांगण्यासाठी माझ्यासोबत एकाच मंचावर यावे, असे आव्हान खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. मोर्चात ओबीसींनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आ.वडेट्टीवारांनी केलेले आवाहन असांसदीय असल्याने काँग्रेस पक्ष व निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत करावे, क्रिमी लेअरची मर्यादा वाढवावी व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी १८ जानेवारी रोजी ओबीसी संघर्ष कृती समिती व अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. सभेत आ.वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सरकारवर ताशेरे ओढून “ओबीसींनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा, लोकप्रतिनिधींना गावात शिरु देऊ नका”, असे आवाहन केले. यासंदर्भात खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवारांचे आरोप खोडून काढले. ते म्हणाले, आपण आमदार असताना अनेकदा तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. शिवाय विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले. खासदार झाल्यानंतरही आपण गडचिरोलीतील ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना घेऊन महामहीम राज्यपालांची भेट घेऊन आरक्षण पूर्ववत करणे व ९ जूनची अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली. शिवाय लोकसभेतही शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करुन शासनाचे लक्ष वेधले. विद्ममान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही अनेकदा भेट घेऊन चर्चा केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हयातील ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे निर्देश दिले आहेत. ओबीसींच्या प्रमुख प्रश्नांची दखल सरकारने घेतली आहे. परंतु सरकारकडे काही जादूची छडी नाही. निर्णय घेताना सरकारला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते, असेही खा.नेते यांनी स्पष्ट केले.