पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय; भाजपाला धक्का

0
45

नागपूर-आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली आहे. हे असतानाच शनिवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर काँग्रेसचे, ३ जागी राकाँचे सभापती विजयी झाले आहेत. तर रामटेक पं.स. बाळासाहेबांच्या शिवसेनेने (शिंदे गट) भाजपच्या मदतीने काँग्रेसकडून सभापतीपद काबीज केले आहे.केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या गृह जिल्ह्यात पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे.
पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन आरक्षणानुसार शनिवारी (ता. १५) निवडणुका पार पडल्यात. माजीमंत्री आ. सुनील केदार यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्‍वर या दोन्ही तालुक्यात काँग्रेसने विजय मिळविला. सावनेरमध्ये अरुणा शिंदे सभापती तर राहुल तिवारी उपसभापती म्हणून निवडून आले. तसेच कळमेश्‍वर तालुक्यात प्रभाकर भोसले सभापती तर र्शावण भिंगारे उपसभापतीपदी विजयी झाले.


कामठी पंचायत समितीत दोन्ही पदे काँग्रेसच्या पारड्यात आली. येथे सभापतीपदी दीक्षा चनकापुरे तर उपसभापतीपदी दिलीप वंजारी विजयी झालेत. नागपूर ग्रामीण तालुक्यातही काँग्रेसनेच बाजी मारली. तेथे सभापतीपदी रूपाली मनोहर आणि उपसभापतीपदी अविनाश पारधी यांची वर्णी लागली. भिवापूर येथे सभापती म्हणून माधुरी देशमुख व उपसभापती म्हणून राहुल मसराम निवडून आले. कुही पंचायत समितीत काँग्रेसच्या वनीता मोटघरे सभापतीपदी तर भाजपचे इस्तारी तळेकर उपसभापतीपदी निवडून आले. उमरेड व भिवापूर येथील प्रत्येकी दोन्ही पदे राखण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. यात उमरेड येथे सभापतीपदी गीतांजली सतीश नागभीडकर तर उपसभापतीपदी सुरेश दयाराम लेंडे यांना यश मिळाले आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये कुही व कामठी येथील सभापती भाजपचे होते. मात्र, यंदा त्यांना येथेही काँग्रेसने धूळ चारली आहे. पारशिवनी तालुक्यात सभापतीपदी काँग्रेसच्या मंगला निंबोणे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्याच करुणा भोवते विजयी झाल्या. रामटेक पं.स.च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने खाते उघडले. यात सभापतीपदी शिंदे गटाचे संजय पुनाराम नेवारे तर उपसभापतीपदी भाजपचे नरेंद्र चंदन बंधाटे विजयी झाले. तर नरखेड आणि हिंगणा येथील प्रत्येकी दोन्ही पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. यात नरखेडमध्ये सभापतीपदी महेंद्र गजबे तर उपसभापतीपदी माया प्रवीण मुढोरिया विजयी झाल्या. तसेच हिंगण्यात सुषमा कावळे सभापती तर उमेश राजपूत उपसभापती म्हणून निवडून आले. काटोल येथे सभापतीपदी राकाँचे संजय डांगोरे तर उपसभापती मात्र, काँग्रेसचे निशिकांत नागमोते विजयी झाले. मौदा येथे एका दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने दोन्ही पदांसाठी ईश्‍वर चिठ्ठी काढली गेली. यात सभापतीपदासाठी ईश्‍वर चिठ्ठीत स्वप्निल र्शावणकर तर उपसभापतीपदी भाजपचे खेमराज चाफळे विजयी झाले.