पांडे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान झाले होते निधन

0
37

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान मृत पावलेले सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे २५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली. पांडे यांचा नांदेड जिल्ह्यात पदयात्रेदरम्यान हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला. पांडे यांना भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे २५ लाखांची मदत देणार असल्याची घोषणा केली.दरम्यान, पांडे यांच्या निधनाबद्दल नागपुरातील अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. अतिशय मनमिळावू आणि अभ्यासू नेते म्हणून के.के. पांडे परिचित होते. काँग्रेसची राजकीय स्थिती विपरीत असतानाही पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवादलाला समर्पित केले होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक महत्वांचा निष्ठावंत नेता आणि मी तर माझा जीवलग भावा सारखा असणारा एकनिष्ठ सहकारी गमावला आहे, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी शोक व्यक्त केला. पांडे आमच्यासाठी प्रेरणादायी राहणार आहेत, अशी शोकसंवेदना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन बँकचे संचालक डॉ. जयंत जांभुळकर यांनी व्यक्त केली.