शेतकऱ्यांचा सन्मान करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प-भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. दानवे

0
11

मुंबई,दि.18-शेती क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांचा सन्मान केला असून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे आपण या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यामध्ये हिंमत असून तो कष्टाच्या जोरावर स्वाभिमानाने जगतो. प्रतिकूल हवामान आणि आधीच्या सरकारने केलेली उपेक्षा यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला. भाजपा युती सरकारने शेतकरी स्वाभिमान वर्ष जाहीर करून यंदाचा अर्थसंकल्प बळीराजाला समर्पित केला आहे. या अर्थसंकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आपण अभिनंदन करतो. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पीक विमा योजना, जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य, पाणंद रस्ता दुरुस्ती, नवीन कृषी आणि पशुसंवर्धन महाविद्यालये, कृषी गुरुकूल योजना, प्रत्येक मंडलात हवामान केंद्रे, गोरक्षण केंद्रे अशा विविध योजनांसाठी राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे.

त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना साथ देतानाच या अर्थसंकल्पात गावांसाठी रस्तेबांधणी, ग्रामपंचायतींसाठी सुविधा, शहरांचा हवाई संपर्क वाढण्यासाठी विमानतळ सुधारणा, नगरपालिकांसाठी विशेष विकास योजना, नोकरदार महिलांसाठी शहरांमध्ये विशेष बससेवा, निराधार महिलांच्या अनुदानात वाढ, अनुसूचित जातीच्या ग्रामीण बेघरांसाठी घरकूल योजना, आदिवासी समाजासाठी भरीव तरतूद असा समाजाच्या सर्व घटकांसाठी विचार करण्यात आला आहे. रस्ते व अन्य पायाभूत सुविधांवर भर, कररचना सुटसुटीत करणे आणि मराठवाडा – विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या देशाच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना न्याय देणारा आहे.