‘धनुष्यबाणा’चा पेच कायम?निकाल आजही नाहीच;तर पुढील सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली

0
14

नवी दिल्ली :-शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाणावर कोणाचा हक्क आहे? यावर अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं यावर आजही निकाल येऊ शकलेला नाही.दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले तसेच पुढील सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली.त्यामुळं यावरचा निकालही लांबला असून यामुळं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा पेच अद्यापही कायम आहे. सुमारे चार तास आयोगात यावर युक्तीवाद पार पडला.

लेखी उत्तरानंतर निकाल येण्याची शक्यता

आजच्या युक्तीवादानंतर सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या लेखी उत्तरात आजच्या युक्तीवादावर दोन्ही गटांकडून आक्षेपही घेतले जाऊ शकतात. त्यामुळं हे लेखी उत्तर आल्यानंतरच यावर निर्णय येऊ शकतो. पण हा निर्णय कधी येईल, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

धनुष्यबाण चिन्ह, पक्षाचं नाव आम्हालाच मिळेल – अनिल परब

आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे मुद्दे अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. देवदत्त कामत यांनी खोडून काढले आहेत. ज्या सादिक अली केसचा मुद्दा त्यांनी मांडला त्यामध्ये जेव्हा दोन्हा प्रतिनिधी समान असतात त्यावेळी या केसचा दाखला दिला जातो. पण आमचा पक्ष जसा आहे तसा मजबूत आहे. त्याचबरोबर त्यांच्या याचिकेतील तृटी होत्या ती सगळी आज आयोगासमोर आणली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंनाच चिन्ह आणि पक्षाचं नावही मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ३० जानेवारीपर्यंत लेखी उत्तरं द्यायची आहेत त्यानंतर निकाल येईल.

शिवसेनेची घटना तीन वेळा बदलली यावर आज चर्चा झाली – राहुल शेवाळे

तीन मुद्द्यांवर आज महत्वाची चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आत्ता नवीन जी पक्षाची घटना बनवली गेली यावर चर्चा झाली. पार्टीची जी ओळख आहे ती लोकप्रतिनिधींवरही अवलंबून असतं. याबाबत दोन्ही पक्षांची भूमिका आयोगानं ऐकून घेतली, त्यानंतर लेखी उत्तरानंतर यावर निर्णय येईल. बाळासाहेबांच्या घटनेनुसार आम्ही सर्व कामं केली आहेत, असा मुद्दा आम्ही मांडला आहे.

प्रतिनिधी सभा ठाकरे गटाची – सिब्बल

शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरे गटाची आहे, शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नाही. पक्ष सोडून गेलेले लोक प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. त्यामुळं घटनेनुसार, प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच आहे आणि प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, असा प्रमुख मुद्दा अॅड. कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर मांडला.

प्रतिनिधी सभा महत्वाची नाही – जेठमलानी

*दरम्यान, सिब्बल यांचा मुद्दा खोडून काढताना शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनीही बाजू मांडली. त्यांनी म्हटलं की, पक्षाची प्रतिनिधी सभा महत्वाची नसून लोकप्रतिनिधींची संख्या महत्वाची आहे. त्यामुळं लोकसभा आणि विधानसभेत शिंदे गटाची सदस्य संख्या बघता आम्हालाच चिन्ह द्या, असा दावा जेठमलानी यांनी केला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळं शिवसेनेत फूट पडली आहे.

*उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारी संपणार

यामध्ये सोमवारी, २३ जानेवारीला उद्ध ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून मुदत संपत आहे. त्यानंतर ही सुनावणी ३० जानेवारीला गेल्यानं यावर अद्द्याप कुठलाही निर्णय आलेला नाही. त्यामुळं पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ मिळते का? याबाबतही स्पष्टता आलेली नाही.