वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका संशयास्पद : ऍड. अणे

0
11

नागपूर – राज्याचे महाधिवक्तापद भूषवित असताना वेगळ्या विदर्भासह मराठवाड्याचा मुद्दा छेडूत भाजपला अडचणीत आणणारे ऍड. श्रीहरी अणे यांनी काल नागपुरात येताच या पक्षावर चांगलेच तोंडसुख घेतले. भाजपची वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट करीत जनमताचा कौल घेण्याची त्यांची तयारी नाही. त्यांनी केवळ वेळकाढू धोरण अवलंबले आहे. आता जनमत तुम्हाला दाखवून दिले जाईल. वेळप्रसंगी कायदा तोडून विदर्भ घेऊ, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. 

राजीनामा दिल्यानंतर आपल्या प्रथम नागपूर आगमनप्रसंगी ते  संविधान चौकात जाहीर सभेत बोलत होते. अणे यांनी भाजपसह कॉंग्रेसवरही शरसंधान साधतानाच शिवसेनेसह मनसेवरही टीकास्त्र डागले..

महाराष्ट्रावर विदर्भाचा पैसा  चोरीचा आरोप करीत ते पुढे म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रातील नेते विदर्भातील नेत्यांमध्ये पैसा नेण्याची क्षमता नसल्याचे नेहमी बोलतात.  ही बाब मान्य केल्यास यशवंतराव ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत एकालाही ते विदर्भाचेही मुख्यमंत्री आहे, असे का वाटले नाही? विदर्भ, मराठवाड्याला जबरदस्तीने महाराष्ट्राशी जोडण्यात आले. महाराष्ट्राने कधीच विदर्भ, मराठवाड्याला राज्याचा भाग समजले नाही.‘‘

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे मित्र आहेत. परंतु मराठावाड्याच्या मुद्यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने माझ्यावर राग काढला.  माझा बोलविता धनी कोण? असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. म्हणून ते अभिनंदनास पात्र असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने विदर्भासाठी जनमत घ्यावे, 51 टक्के नागरिकांनी विदर्भ मागितला नाही, तर ही मागणीच सोडून देईल. विदर्भासाठी विध्वंसक मार्गाने जाण्याची गरज नाही. कायद्यावर माझा विश्वास आहे. जे काही करायचे ते कायदेशीर प्रक्रियेनेच केले जाईल. परंतु, प्रकरण हाताबाहेर गेल्यास कायदा तोडून सत्याग्रह करण्याचा इशाराच त्यांनी दिला.

या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, प्रा. हरिभाऊ केदार, राम नेवले, माजी पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.