पाच वर्षात महाराष्ट्राचा चेहरा बदलून दाखवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
8

नाशिक-विकास कामे, भ्रष्टाचारविरोधी कारवाई आणि प्रशासनात बदल या जोरावर पाच वर्षात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला तर सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे, असा संदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी दिला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमितीच्या उद्घाटन सत्रात दोन्ही नेते बोलत होते. बैठकीस भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, भाजपा प्रदेश प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी राकेशसिंहजी, राष्ट्रीय सचिव श्याम जाजू, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, राज्याचे मंत्री एकनाथराव खडसे, चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, प्रकाश मेहता, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर व माजी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सलग दोन वर्षे दुष्काळाला तोंड द्यावे लागले. सरकारने शेतकऱ्यांना अठरा हजार कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक मदत दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या मार्गावर आला आहे. शेतकरी, उद्योग, वंचित घटक अशा सर्वांसाठी सरकारने प्रभावी काम केले आहे. बिल्डरांनी अनधिकृत बांधकाम केल्यामुळे फसलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे बांधकाम अधिकृत करण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी अशा बिल्डरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने खूप चांगले निर्णय घेतले आहेत. हे काम लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देण्याच्या कामात संघटनेने सहभागी व्हावे.

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. भाजपा सरकारने पावणेदोन वर्षात जेवढे काम केले तेवढे काम काँग्रेसने पन्नास वर्षात केले नाही. या सरकारच्या माध्यमातून झालेली प्रगती विरोधकांना बघवत नाही. ते लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून भलत्याच मुद्द्यांवर चर्चा करतात. त्यामुळे सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यांनी गावोगाव जाऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती द्यावी. आता पक्षाने आपली पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड केल्याबद्दल आपण नेत्यांचे व कार्यकर्त्यांचा आभारी आहोत.