मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. पाटील, प्रा. शिंदे, दिलीप कांबळे व शिवतारेंना बढती ?

0
9

मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीनंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालटाविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महसूलमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार यासह विस्तारात कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता असतानाच कामगिरी आणि क्षमतेचा विचार करूनच राज्यमंत्र्यांना देण्याबाबत मुख्यमंत्री विचार करीत असल्याचे वृत्त आहे. तसेच भाजपच्या आमदारांची ज्या मंत्र्याप्रती नाराजी आहे त्याच्याबद्दल पण विचार करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.तर आपल्या कामकाजाने छाप न पाडलेल्या मंत्र्यांबाबत कोणतीही तडजोड न करता थेट डच्चू मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.सोबतच डॉ. रणजित पाटील, प्रा. राम शिंदे, तसेच दिलीप कांबळे यांची, तर शिवसेनेतून विजय शिवतारे यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे दिलीप कांबळे हे वरिष्ठ आमदार असतानाही त्यांना सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री पद देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता.विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पोवार समाज हा नेहमीच या पक्षाच्या बाजुने राहूनही या पक्षाच्या आमदाराला राज्यमंत्री सुध्दा करण्याचे धाडस भाजपने न दाखविल्याने पक्षाबद्दल नाराजी सुरु आहे.त्यातच ओबीसीच्या प्रश्नावर सामाजिक न्यायमंत्र्यांनी ओबीसी विरोधी घेतलेली भूमिका सुध्दा भविष्यात भाजपला घातक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

सरकारमधील एखाद्या मंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर आरोप झाले, तर सरकारची प्रतिमा मलिन होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पक्ष श्रेष्ठींना उत्तरे द्यावी लागतात. एकनाथ खडसे यांचा राजीनामा या कारणामुळेच त्यांना घ्यावा लागला. त्यामुळे राज्यमंत्र्यांच्या दीड वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा तयार करून त्यावर चर्चा केली जाणार आहे. या निकषाच्या आधारेच राज्यमंत्र्यांचे कॅबिनेटपदी बढती होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.