भाजपा उमेदवाराचे नातेवाईक प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड अर्धा तास चर्चा

0
12

अकोला,दि.20- लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर सध्या देशासह महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे.या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.

असे असतानाच भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांचे मेहुणे तथा अकोला जिल्ह्यातील शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या द्वयींमध्ये बंद दाराआड साधारण अर्धा तास चर्चा झाल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अद्याप महाविकास आघाडीचा भाग झालेला नाही. तसं खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच अनेकदा स्पष्ट केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश पोहरे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर प्रकाश पोहरे यांनी प्रतिक्रिया दिली. आमची ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं प्रकाश पोहरे यांनी सांगितलं आहे.मी संपादक असलेल्या वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मी प्रकाश आंबेडकरांना भेटायला आलो होतो, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

प्रकाश पोहरे हे अकोला जिल्ह्यात सर्वपरिचित असे नाव आहे. ते भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे मेहुणे तर भाजपचे अकोला मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे मामा आहेत.विशेष म्हणजे प्रकाश पोहरे हे विदर्भातील एका दैनिकाचे मुख्य संपादकही आहेत. अकोला जिल्ह्यात त्यांना शेतकरी नेते म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत काम केलेलं आहे.

त्यांनी 1991 साली अकोला लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते किसान ब्रिगेड या शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.त्यांनी काही दिवस तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ या पक्षातही काम केलेलं आहे.दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे अजूनही अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील झालेले नाहीत. वेळ आलीच तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू, अशी भूमिका वंचितच्या नेत्यांकडून घेतली जात आहे.त्यामुळेच महाविकास आघाडीने वंचितला अल्टिमेटम दिलंय. प्रकाश आंबेडकरांनी 19 मार्च रोजी संध्याकाळपर्यंत आपला निर्णय न सांगितल्यास आम्ही त्यांच्याशिवाय निवडणूक लढवू,असं महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसने ठरवलंय. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्यास ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 15, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 आणि वंचितला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वंचितने आपली वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी कळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.