जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा

0
8

भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज छाननीनंतर समर्थनाची भूमिका जाहीर करणार असल्याचे विकास फाऊंडेशनचे संस्थापक चरण वाघमारे यांनी जाहीर केले होते. मेळावा घेऊन गुप्त मतदान पद्धतीने कार्यकर्त्यांची मते जाणून कार्यकर्त्यांचा मतांचा आदर ठेऊन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची माहिती विकास फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांबाबत स्वपक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली असताना आमचा उमेदवार नसल्याने समर्थन कोणाला करावा, स्वमर्जीने समर्थन दिल्यास संघटनेत नाराजीचा सूर उमटू नये याकरिता ४ एप्रिल रोजी सक्रीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला व गुप्त मतदान पद्धतीने कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट झाले. ज्या पक्षाने वेळोवेळी आपल्यावर अन्याय केला त्या भाजपच्या उमेदवाराला हरवण्यासाठी स्पर्धेत असणाऱ्या काँग्रेसच्या डॉ. प्रशांत पडोळे यांना समर्थन दिल्यास योग्य होईल, अशी भावना सुध्दा मतपेटीतून व्यक्त करण्यात आली.
या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असुन भाजपचे सुनील मेंढे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. मागील निवडणुकीत मी भक्कमपणे मेंढे सोबत खंबीरपणे उभा होतो. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मेंढेंनी भाजपच्या अनेक मोठ्या नेत्याजवळ माझा विरोध करुन माझी तिकीट कापून मी अपक्ष असतांनी मेंढेसह भाजपच्या अनेक नेत्यांनी मला हरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी चरण वाघमारे यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, भाजपचा उमेदवार जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले तेव्हा काही भागात भाजपची मते राष्ट्रवादीकडे वळवल्या गेली. शेवटी व्हायचे ते झाले, माझे निलंबन झाले. पण कालांतराने जि.प. आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन माझे निलंबन रद्द करून निवडणुक प्रमुख बनविले. जि. प अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केल्याने पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला निलंबित केले. त्यावेळी ही त्यांनी माझी बाजू घेतली नाही नसल्याची सल वाघमारे यांनी बोलून दाखविली. त्यामुळे मेंढेंना समर्थन दिल्यास मला व माझ्या कार्यकर्त्यांना भविष्यात कोणताच राजकीदृष्ट्या फायदा नाही उलट त्रासच होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.
सामाजिक बांधिलकी लक्षात घेता बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर भाजपमध्ये असताना २०१९ च्या निवडणुकीत माझ्या विरोधात भाजपच्या प्रदीप पडोळेसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यानंतर नगर पंचायत मोहाडीच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असताना कुंभलकर यांनी ४ नगरसेवक फोडून १४ दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. समाज या नात्याने कुंभलकर यांना त्यावेळी मी समर्थन मागितले तेव्हा त्यांनी मला स्पष्ट नकार दिला.त्यामुळे त्यांना समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांचे वडील स्व. यादोराव पडोळे यांच्या सहकार्यामुळे मला एक वेळी सभापती होता आले. त्यांचे ऋण फेडण्यासाठी कोणतेही अट न ठेवता आम्ही प्रशांत पडोळे यांना समर्थन देत असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला धनंजय मोहकर, डॉ. प्रकाश मालगावे, अरविंद भालाधरे, भास्कर हटवार, ललित शुक्ला, बालु सेलोकर, नंदु रहांगडाले, बबलू मलेवार , राजू रेवतकर, हिरालाल नागपुरे, राजेश पटले, प्रशांत लांजेवार,हरिश्चंद्र बंधाटे, छोटू तुरकर, मेहताबशिंग ठाकुर, हिरालालजी रोटके, हंसराज आगासे, बालचंद पाटील, अरूणजी भेदे, राहुल फुंडे , सेवक चिंधालोरे, राजू गायधने, चंद्रशेखर भिवगडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.