मी सहजपणे काहीही बोलत नाही – पवारांचे टीकास्त्र

0
8

बार्शी- मी सहजपणे काहीतरी बोलत नाही, जे बोलतो ते विचारपूर्वकच असते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शी येथे शनिवारी व्यक्त केले. एका खासगी कार्यक्रमासाठी पवार बार्शी येथे आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, दादर येथील डॉ. आंबेडकर भवन पाडण्याचे नेमके कारण आपल्याला माहीत नाही. रत्नाकर गायकवाड हे एकेकाळी मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी कायदेशीर बाबी तपासल्या असाव्यात. त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनातील लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या असून याबाबत काही चूक झाली असल्यास क्षमा करण्यासारखे नाही. शासनाने याबाबत तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी.

पावसाने आेढ दिल्याने विदर्भ, हिंगोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे जळगाव अशा अनेक भागात पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या तारखा उलटून गेल्या आहेत. आता नवीन तारखा जाहीर होत आहेत. अनेक धरणाचे साठे आटले आहेत, उजनीची परिस्थिती तर पाणी नसल्यासारखीच आहे. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांत पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल.

युतीसत्ता सोडणार नाही : भाजपआणि शिवसेना दोघेही सत्ता सोडणारे नसून गळ्यात गळे घालून सत्ता भोगणारे आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आदी निवडणुकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढल्या असून त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील धोरणे ठरवले आहेत. लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या शेअर सर्टिफिकेटवर त्यांच्या परस्पर मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून रक्कम गोळा केली असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, हे प्रकरण मला माहीत नाही. मात्र, अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा असल्याचेही पवार म्हणाले.