राष्ट्रीय विधी विद्यापीठात ४२ पदांना मान्यता

0
15

नागपूर : उपराजधानीतील बहु्प्रतीक्षित राष्ट्रीय विधी विद्यापीठाची यंदापासून सुरुवात होणार आहे. या विद्यापीठात ४२ शिक्षक व शिक्षकेतर पदांना राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर डॉ. विजेंदर कुमार यांची मे महिन्यात निवड करण्यात आली होती.
गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची सुरुवात या शैक्षणिक सत्रापासूनच होणार आहे. ‘जोती’च्या (ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) इमारतीत वर्ग सुरू होणार आहेत. यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रियेने गती घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉ. विजेंदर कुमार यांच्या रूपाने पूर्णवेळ कुलगुरूदेखील लाभले आहे.
विद्यापीठातील सर्व सुविधा, अभ्यासक्रम, विद्यार्थीसंख्या, विविध शाखा, प्राध्यापकवर्ग आणि इतर सर्व गोष्टी नियमांप्रमाणे असणे अपेक्षित आहे. विद्यापीठातील पदभरतीसंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला. यानुसार ४२ पदांना शासनाने मान्यता दिली आहे. यात कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह दोन प्राध्यापक व सहा सहायक प्राध्यापकांच्या पदांचा समावेश आहे. तर उपकुलसचिव, ग्रंथपाल, प्रशासकीय अधिकारी अशा ३३ पदांचा शिक्षकेतर पदांमध्ये समावेश आहे. यातील २२ पदे ही ‘आऊटसोर्स’ करण्यात येणार आहे. विद्यापीठातील एकूण ४२ पदांसाठी राज्य शासनाने १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९८८ रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.